कोरोनातील लॉकडाऊन आणि पवित्र रमजान


    
    

       जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना नामक जीवघेण्या विषाणूने संपूर्ण विश्व त्रस्त आहे. त्याच्या विरुद्धच्या लढाईला खंबीरपणे तोंड देता देता आख्खं जग बंद घरामध्ये अडकून बसलं आहे. सोशल डिस्टंसिंग पाळा, कोरंटीन पाळा, मास्क वापरा, नियमित हाथ साबणाने धुवा, गर्दी टाळा यासारख्या अनेक सूचना सरकार आणि प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि धर्मस्थळे अनिश्चित कालावधी साठी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरिकांकडून त्यासाठी चांगला प्रतिसादही मिळत आहे.


याच लॉकडाऊन च्या काळात मुस्लिमांसाठीचा पवित्र महिना "रमजान" आला आहे. इस्लामिक कॅलेंडरच्या नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणतात. या महिन्यात तीस दिवस उपवास करणे प्रत्येक शारीरिक सक्षम मुस्लिमांसाठी अनिवार्य आहे. जगभरातील मुस्लिमांसाठी हा उपवासाचा महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्यदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता पीता उपवास करतात. या उपवासाचा अर्थ व्यक्तीच्या मनाला अध्यात्माशी जोडणे आहे, ज्यामुळे त्याच्यामध्ये कृतज्ञता आणि आपुलकीची भावना निर्माण होते जेणेकरून ती व्यक्ती वर्षभर संयम आणि नियम पाळेल. "रमजान" महिन्याला "बारकतीचा" महिनाही म्हणतात. व्यक्तीस वाईटापासून, व्यसनापासून, आणि वासनेपासून दूर ठेवणारा हा महिना आहे. संयम,त्याग,सहिष्णुता प्रामाणिकपणा, आपुलकी, आणि सदभाव व्यक्तीच्या अंगी रुजवणारा असा हा पवित्र महिना आहे. कोरोना विषाणूने आज जगातील कोणत्याही देशाला सोडले नाही. काही लोक अद्याप त्याकडे गांभीर्याने घेत नाहीत. हा धोका वास्तविक आहे हे समजण्यास ते अपयशी ठरत आहेत आणि जर आपल्यासह आपल्या कुटुंबातील सदस्यांची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर आम्हाला शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करावे लागेल आणि संपूर्ण खबरदारी घ्यावी लागेल.


अल-तिर्मिदी या धार्मिक पुस्तकातील हदीसप्रमाणे; एकदा एक व्यक्ती प्रेषित हजरत मुहम्मद साहब यांच्याकडे आली परंतु त्याने आपले उंट बांधले नाही. असे विचारले असता त्याने सांगितले की त्याने असे केले कारण देवावर त्याचा विश्वास आहे. हे ऐकून प्रेषित त्याला म्हणाले, “जा, आधी उंटाला बांधा आणि मग परमेश्वरावर विश्वास ठेवा.” या हदीसवरून हे स्पष्ट झाले आहे की देवावर विश्वास ठेवला पाहिजे, परंतु सर्व प्रथम स्वतःच्या बाजूने त्यासाठी लागणारी खबरदारी घ्यावी लागेल. आज केवळ केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारचीच जबाबदारी नाही तर या विषाणूचा प्रसार पुढे होऊ न देणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. इस्लाममध्ये जीव वाचविणे हे कर्तव्य म्हणून वर्णन केले गेले आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनाच्या संरक्षणासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात.हा रमजान जगातील सर्व मुस्लिमांसाठी एक असा काळ आहे ज्यात ते आपल्या घरात साधेपणाने राहून उपवास उघडू शकतील. आपण एकटेपणाने प्रार्थना करू आणि आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी जास्तीत जास्त वेळ घालवू. दुर्दैवाने, रमजान म्हणजे इफ्तार पार्टी आणि बाजारपेठेत खरेदी करणे हेच आपल्यासाठी बनून बसले आहे. रमजान महिन्यात बहुतांशी लोकं आध्यात्म सोडून बाकी सर्व करताना पाहावयास मिळतात. पण या वेळेस रमजान एकांतात घालवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. प्रेषित हजरत मोहम्मद साहेब यांना अपेक्षित रमजान घालवन्यासाठी आणि रमजानचा खरा अर्थ समजण्यासाठी आपल्या पिढीला मिळालेली ही पहिलीच वेळ आहे. जर त्या सर्वांना एक महिना आपला ज्ञान वाढविण्यात घालवता आला तर ते आयुष्यभर त्याचे फायदे पाहू शकतील.Previous
Next Post »